Parable StoryParable Story

राजा व राणीची – बोधकथा

फार वर्षापूर्वीची गोष्‍ट आहे. एक राणी आपले ओले केस सुकविण्‍यासाठी राजवाड्याच्‍या छतावर गेली होती. तिने आपला मौल्‍यवान कंठा काढून बाजूला ठेवला व केस विंचरू लागली. इतक्‍यात तिकडून एक कावळा आला. कावळयाला तो कंठा (गळ्यातील हार) म्‍हणजे काहीतरी खाण्‍याची गोष्‍ट वाटली व तो कंठा घेऊन कावळा उडून गेला. एका झाडावर बसून त्‍याने कंठा खाण्‍यासाठी प्रयत्‍न केले. मौल्‍यवान अशा कंठ्यामध्‍ये हिरे जडलेले होते. कठोर अशा हि-यांवर चोच मारून मारून तो थकला व त्‍याने ते खाण्‍याचा नाद सोडून दिला. तो कंठा तसाच झाडावर लटकत ठेवून त्‍याने आकाशात भरारी मारली ते अन्नाचा शोध घेण्‍यासाठी.

इकडे राणीने केस विंचरले व तिच्‍या लक्षात एक गोष्‍ट आली की आपला मौल्‍यवान कंठा गायब झाला आहे. इकडेतिकडे शोध घेऊनही तिला तो सापडेना शेवटी ती रडत रडत राजाकडे गेली व म्‍हणाली, “महाराज माझा प्राणप्रिय असा कंठा चोरीला गेला आहे. तुम्‍ही त्‍याचा शोध घेण्‍याचे आदेश द्या.” राजा म्‍हणाला, “दुसरे इतरही दागिने आहेतच की तुला. तोच कंठा कशाला पाहिजे.” राणीने ऐकले नाही व तोच कंठा पाहिजे म्‍हणून हट्ट धरून बसली. राजाने कंठा शोधण्‍याचे आदेश दिले.

सर्वजण तो शोधू लागले पण कोणाला काही तो कंठा सापडेना. राजाने कोतवालाला बोलावून सांगितले की आजच्‍या आज तू, सर्व शिपाई, सैनिक, प्रजा सगळे मिळून त्‍या हाराचा शोध घ्‍या. जो कोणी तो हार आणून देईल त्‍याला आपण अर्धे राज्‍य बक्षीस म्‍हणून देऊ अशी घोषणाही त्‍याने त्‍यावेळी केली. अर्धे राज्‍य बक्षीस मिळेल या आशेने सर्वजणच कामाला लागले.

सगळीकडे शोधयंत्रणा सुरु झाली. शोधता शोधता अचानक कुणाला तरी तो हार सापडला. एका घाणेरड्या पाण्‍याच्‍या नाल्‍यामध्‍ये त्‍याला तो हार दिसला. पाणी इतके घाणेरडे होते की जवळून जातानासुद्धा किळस यावी, दुर्गंध सर्वत्र पसरला होता. पण त्‍या पाण्‍यात तो हार पडलेला दिसून येत होता. हार दिसताक्षणी अर्धे राज्‍य बक्षीसाच्‍या आशेने एका सैनिकाने त्‍या पाण्‍यात उडी मारली. सगळीकडे शोधले त्‍याने पण हार काही मिळाला नाही. हार जणू गायबच झाला. सैनिकाने मारलेली उडी पाहून कोतवालाच्‍या मनातही लोभ निर्माण झाला. त्‍यानेही अर्धे राज्‍य मिळविण्‍यासाठी त्‍या नाल्‍यात उडी मारली. पण हार पुन्‍हा गायब झाला. त्‍या दोघांना जसा हार दिसला तसा इतर प्रजाजनांनाही तो हार दिसला व सगळेजण बक्षीसाच्‍या आशेने त्‍या घाण पाण्‍यात उड्या मारू लागले पण हार कुणाच्‍याच हातात येत नव्‍हता. सगळेजण उडी मारताहेत पाहून मंत्री, सरदारही, मुख्‍य प्रधानजी यांनाही अर्ध्‍या राज्‍याची हाव सुटली व तेही घाणेरड्या पाण्‍यात उड्या मारू लागले. पण हार काही सापडेना. जेव्‍हा कोणी उडी मारे तेव्‍हा हार गायब होऊन जाई. हार सापडत नाही हे लक्षात आले की तो मनुष्‍य त्‍या पाण्‍याच्‍या वास सहन न झाल्‍याने पटकन पाण्‍यातून निघून बाहेर येई व तो बाहेर पडता क्षणी हार पुन्‍हा दिसू लागे.

मंत्री, सरदार, मुख्‍य प्रधान यांनी घाणेरड्या पाण्‍यात उड्या मारून हार शोधण्‍यासाठी प्रयत्‍न केले हे राजाच्‍या कानावर गेले व त्‍याला वाटले की यांनी जर हार शोधला तर मला माझे अर्धे राज्‍य गमवावे लागेल. त्‍यासाठी राजाही तेथे आला व त्‍याने आपली राजवस्‍त्रे उतरवली आणि त्‍यानेही त्‍या नाल्‍यात उडी मारली. त्‍याचवेळेस तिथून एक संत जात होते. राजाला उडी मारलेली पाहिली आणि तो मोठमोठ्याने हसू लागले. त्‍यांनी विचारले हे काय चालले आहे? सगळेजण असे चिखलात, घाणीत का माखला आहात? राजा असणारा माणूस असल्‍या घाणेरड्या पाण्‍यात का उडी मारतो आहे? लोकांनी उत्तर दिले, राणीचा हार पाण्‍यात पडला आहे म्‍हणून सर्वजण पाण्‍यात उड्या मारत आहेत पण उडी मारताक्षणी कसा कोण जाणे तो हार गायब होतो आहे. संत अजूनच मोठ्याने हसू लागले. लोकांनी त्‍याना विचारले काय झाले? संत त्‍यावर म्‍हणाले, “अरे वेड्यांनो तुम्‍ही ज्‍या हाराकडे पाहून पाण्‍यात उड्या मारत आहात तो हार झाडावर आहे आणि पाण्‍यात दिसते आहे ते त्‍याचे प्रतिबिंब आहे. खरा हार हा झाडावर आहे आणि तुम्‍ही प्रतिबिंबाला हार समजून पाण्‍यात शोधत आहात.” लोकांच्‍या लक्षात खरा प्रकार आल्‍यावर लोक शरमिंदा झाले.

तात्पर्य: मानवी जीवनाची पण आज त्‍या लोकांप्रमाणेच अवस्‍था झाली आहे. जे आपल्‍याला पाहिजे आहे त्‍याच्‍या प्रतिरूपाकडे, प्रतिबिंबाकडे पाहून आपण ते मिळविण्‍याचा प्रयत्‍न करत आहोत. खरे सुख, समाधान, शांती, मन:स्‍वास्‍थ्‍य हे शोधण्‍यापेक्षा आपण त्‍याची प्रतिरूपे, प्रतिबिंबे जवळ करत आहोत. यातून काही मिळण्‍यापेक्षा आपण किती तरी गोष्‍टी गमावित आहोत. खरंय ना….?

विनोदी कथा….

भारतातील प्रसिध्द ठिकाणे

राजा व राणीची - बोधकथा, Ranjit Singh, Maharaja Punjab, his
राजा व राणीची – बोधकथा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *