Theft Marathi Story
परमेश्वर कबीरजींच्या कथनानुसार एका गावात एक साधुपुरुष जंगलात आश्रम बांधून राहत होते. काही दिवस आश्रमात राहायचे, सत्संग करायचे, परत परिभ्रमण करण्यास जायचे.
एक जाट शेतकरी काही महिन्यांपूर्वीच त्यांचा शिष्य झाला होता. शेतकरी गरीब होता. त्याच्याजवळ एक बैल होता. दुसर्या शेतकर्यासोबत मिळून मिसळून त्या बैलाच्या सहाय्याने शेती करीत होता. दोन दिवस दुसर्यांचा बैल स्वतः घेऊन दोन्ही बैलाच्याकडून नांगर फिरवून घेत असे. मग पुढचे दोन दिवस दुसरा शेतकरी त्याचा बैल घेऊन आपल्या बैलासोबत जोडून नांगर चालवायचा.
आपल्या कच्च्या घराच्या अंगणात शेतकरी आपला बैल बांधत असे. एका रात्री चोराने त्या शेतकर्याचा बैल चोरला. शेतकर्याने पाहिले की बैल चोरी झाला आहे. तेव्हा तो सकाळी आश्रमात गेला. गुरूदेवजींना आपले दु:ख सांगितले.
गुरूदेवजी त्याला म्हणाले की बेटा! परमात्म्यावर विश्वास ठेव. दान-धर्म-भक्ति करत रहा, तुला परमात्मा दोन बैल देईल. जो बैल चोरून घेऊन गेला आहे, तो पापात सहभागी आहे. भगवंताच्या कृपेने पाउस उत्तम झाला. शेतकरी भक्ताचे चौपट पीक आले. भक्त शेतकर्याने दोन बैल घेतले आणि त्यांना उत्तम खुराक दिला.
बैल सांडांसारखे ताकदवान झाले. गावात त्याच्याच बैलांची चर्चा व्हायची. एक वर्षानंतर तोच चोर त्याच भागात चोरी करण्यास आला. कुठे डाव जमला नाही. त्याने विचार केला ज्याचा बैल चोरला होता, त्याच्याच घरी बघूया. त्याने नवीन बैल घेतलेला असू शकतो. पाहतो, तर दोने धष्टपुष्ट बैल बांधलेले होते.
चोराने दोन्ही बैल चोरून नेले. शेतकरी उठला, तर दोन्ही बैल चोरीला गले होते. गुरूजींना सांगितले, तर गुरूजी म्हणाले की बेटा! परमात्मा तुझ्या घरी चार बैल देईल. चोर कधीही श्रीमंत होत नाहीत. पापी-पाप जमा करतो आहे. परमात्म्याची मर्जी, गुरूदेवाचा आशीर्वाद, यामुळे पावसाने शेतकर्यांची चंगळ केली. भक्त शेतकर्याकडे पुरेशी जमीन होती. परंतु पावसांच्या अभावी तो शेती थोड़याच भागात करायचा. पाऊस चांगला झाला. दोन बैल विकत घेतले आणि दोन बैल कर्ज घेऊन घेतले. शेती जास्त जमिनीत केली. एक नोकर नांगर चालविण्यासाठी ठेवला. एका वर्षात सगळे कर्ज फेडले. बैल सुद्धा चार झाले होते, ते सुद्धा सांडासारखे तगडे.
घर सुद्धा पक्के बनविले. दोन वर्षांच्या नंतर चोर परत तिथे गेला. सर्वप्रथम त्याच शेतकर्याची परिस्थीती पहायला गेला. चोराने पाहिले की चार सांडासारखे बैल बसले होते आणि चोराच्या जवळ फक्त दोन दिवसांचीच कणिक शिल्लक होती. तो अधिकच गरीब झाला होता. चोराने शेतकर्याला रात्रीच्या झोपेतून उठविले. तेव्हा शेतकर्याने विचारले, तुम्ही कोण आहात. चोराने सांगितले की मी तुमचे तीन बैल चोरी केलेला चोर आहे.
शेतकरी म्हणाला दादा! माझी झोप खराब करू नको. तू आपले काम कर. परमात्मा त्याचे काम करत आहे. मला झोपू दे. चोराने पाय पकड़ले आणि म्हणाला, हे देवता! माझ्याकडून आता चोरी होणार नाही. एक सांग, चोर तुझ्या समोर उभा आहे पण तू पकडत का नाही? तुझा एक बैल मी चोरला, पुढल्या वर्षी तुझ्या घरी दोन सांडासारखे बैल बांधले होते, ते दोन्ही बैल मी चोरले. आज दोन वर्षांच्या नंतर, तुझ्या घरी चार सांडासारखे बैल बांधले आहेत. माझा तर सर्वनाश झाला आहे. माझी मुले भुकेली असतात. मला मारझोड कर, पण तुझ्या यशाचे रहस्य सांग. मी पण जाट शेतकरी आहे. जमीन पण आहे. पण गरिबीला अंत नाही.
भक्त शेतकर्याने त्याला सांगितले, की, तुम्ही स्नान करा, जेवण करा. चोराने तसे केले. मग भक्त त्या चोराला घेऊन आश्रमात आला. गुरूदेवानी सर्व घटना कथन केली. गुरूदेवानी चोराला समजावले. सात-आठ दिवस भक्त शेतकर्याने त्याला आपल्या घरी ठेऊन घेतले आणि रोज गुरूजींना भेटवून सत्संग ऐकवला. चोराने अनुग्रह घेतला. गुरूजींनी म्हटले की भक्त बेटा! नवीन भक्ताला एक बैल उधार दे. तो शेती करेल आणि तुझे पैसे परत करेल.
भक्त म्हणाला, गुरूजी! ठीक आहे. भक्त शेतकर्याने नवीन भक्ताला एक बैल दिला. नवीन भक्त प्रत्येक महीन्यात सत्संगात येत असे. पूर्ण कुटुंबाने अनुग्रह घेतला. दोन वर्षात आर्थिक स्थिति उत्तम झाली. एक बैल विकत घेऊन चोरलेल्या तीन आधीच्या बैलांचे रूपये घेऊन चोर भक्त त्या शेतकरी भक्ताच्या घरी गेला. त्याची मुले त्याच्या सोबत होती. शेतकरी भक्ताकडे सगळे पैसे देउन चोर भक्ताने म्हटले की मला क्षमा कर. तुमचे उपकार माझ्या सात पीढ्या सुद्धा फेडू शकणार नाहीत.
जुना भक्त म्हणाला अरे दादा! ही सर्व गुरूदेवांची कृपा आहे. त्यांचे शब्द फळले आहेत. तुम्ही हे सर्व रूपये गुरूजींना दान रुपात द्या. मला तर त्यांनी आधीच कैकपट बैलांचे भांडवल दिले होती. हे माझ्या कामाचे नाही. दोघेही भक्त गुरूजीकडे गेले आणि सर्व दान रक्कम त्यांच्या चरणी वाहिली. गुरूजींनी ती रक्कम भोजन-प्रसादात देऊन सत्संग केला.
अशा प्रकारे चोरीचे धन मोरीत जाते. भक्त सदैव वैभवात जगतो.