कहाणी चाळिशीची, दिव्याच्या अमावस्येची | The story of the forties, the new moon of the lamp

कहाणी चाळिशीची, दिव्याच्या अमावस्येची | The story of the forties, the new moon of the lamp

एकदा दोन मैत्रिणी ऑफिसमधून घाईघाईने बाहेर निघाल्या. एक दुसरीला म्हणते, “अग आज दिव्याची अमावस्या, श्रावण सुरू होईल. घरी जाताना पुरणाचे सामान, आघाडा, दुर्वा घ्यायचे आहे. आघाडा नाही मिळाला तर सासूबाई पुन्हा पाठवतील बाजारात. जातानाच घेते. हल्ली गुढघा दुखतो माझा गाडीवर फिरून.”

दुसरी तिच्या हाताला धरून तिला क्षणभर बसवते, ” बाई, कित्येक वर्षे तुझी धावपळ पहाते आहे. तुला एक व्रत द्यायचे आहे . ऐकशील? “

बाई बाई, कबुली देणं सोपं नसतं, ठाऊक आहे मला. पण द्यावी ग कबुली… कधीकधी प्रांजळपणे. चाळीशी पार होत आलेली असते. शरीर गप्पा मारायला लागतं, त्याचं अस्तित्व दाखवायला लागतं. कान द्यावेत त्याला क्षणभर अन ऐकावं त्याचं.

मुलांच्या शाळा, नवऱ्याचा डब्बा, इगो, घरातल्या वयस्कर लोकांच्या तू समजून घेऊन अंगावर घेतलेल्या जबाबदाऱ्या… सगळं तस्संच ठेवायचा तुझा आग्रह…. अर्थात स्वाभाविक आहे.

त्यासाठी तुझी अखंड धडपड सुद्धा ! ऑफिसमध्ये बाई म्हणून कोणतीही सवलत घेणं तत्वतः तुला पटतच नाही, तशी मानी आहेस तू… त्याचा सगळ्यांना रास्त अभिमानसुद्धा आहे. त्यासाठी प्रत्येक आघाडीवर अटीतटीने लढताना एक क्षणभर थांब जरा. किंचित “पॉझ ” घे.

सकाळी उठून ओट्यापाशी उभे राहणारे तुझे पाय काही सांगू पाहतात तुला.

अखंड गाडीवर फिरणाऱ्या या झाशीच्या राणीची पाठ कुठेतरी जाणवून देतीये तिचे अस्तित्व… आजकाल कणिक मळताना हात गप्पा मारतात.

अभ्यास घेताना मुलांच्या समोर बसलं, की उठताना गुढघा झकास कळ मारतो अचानक… अन घाईघाईत अकारण ओशाळला चेहरा करून तू उठतेस. ओठावर आलेले ,” आई गं ” गिळून टाकतेस, अन कान घट्ट बंद करून पुढच्या तयारीला लागतेस.

बाई ग, तुलाही एकच जन्म मिळाला आहे. सुपर वुमन बनण्याच्या नादात किती ओढशील शरीराला…

थांब जरा… यावेळी श्रावणात सणवार करताना नाही पाळलेस फार तरी चालेल. मैत्रिणींचे पुरणपोळ्या केल्याचे, सणवार साजरे केल्याचे फोटो, मेसेज नुसते पाहिलेस तरी चालतील… पण श्रावणात एक व्रत घे… कबुली दे स्वतःला ,” मी माझ्या शरीराला माझे कान देईन… ऐकेन त्याचं… नाही एखादी गोष्ट जमली… तर ते स्पष्ट सांगायचे धैर्य ठेवेन. घरात सांगेन सगळ्यांना की दमते मी ही. नका गृहीत धरू “

बघ बरं करता येईल का असे. जमेल तुला. हे व्रत तसे सोपे नाही मैत्रिणी.

त्यासाठी काय करावं ? मन घट्ट करून आपल्या खोलीत यावे. दहा मिनिटं मांडी घालून बसावे. मनाचा आरसा लख्ख घासून घ्यावा. आपल्याच लहानपणीचा चेहरा समोर आठवावा. किंचित हसू येईल. ते हसू पकडून ठेवावं आणि मग आपल्या अवयवांशी गप्पा माराव्यात… त्यांना बोलतं करावं… त्यांची दुःखं जाणून घ्यावीत. पुन्हा एकदा लहानपणीचा चेहरा आठवावा.

खोल श्वास घ्यावा… आपल्या अवयवांना मनापासून सांगावं , ” बाबांनो मी उतणार नाही… मातनार नाही… तुम्ही इतके दिवस न कुरकुरता माझी साथ दिलीत, मी तुमची साथ सोडणार नाही. “

मग काय करावं ? चेहऱ्यावरून दोन्ही तळवे फिरवावेत. चाळीशीच्या बदलाची नोंद करावी. आपले रुटीन थोडेसे बदलावे. ओट्याजवळच्या बेसिनचा नळ सोडावा. सगळे काही पहिल्यासारखे असावे, असलेच पाहिजे हा अट्टहास त्यात सोडून द्यावा. फक्त आपल्यासाठी आपल्याला हवा तसा एकच कप चहा करावा. इतक्या मोठ्या घरात पहिल्यांदाच स्वतःसाठी एखादा कोपरा धुंडाळावा… मघाशी सांगितलेले चिमूटभर धैर्य घ्यावे, ” दहा मिनिटं मला हाक मारू नका रे ” असे जाहीर करावे आणि सावकाश तो कप संपवावा.

श्रावणाच्या चाळीशीचे हे व्रत कोणी करावे ?

स्वतःला दुय्यम स्थान देऊन घरातल्या सगळ्यांच्या हाकेला ओ देणाऱ्या सुपरवुमन ने करावे. घरचे आवरून, ऑफिस गाठून पोरांचा अभ्यास घेऊन रात्री ओटा आवरणाऱ्या आईने करावे. पेपर वाचत दोन कप चहा पिणाऱ्या अन दळण -किराणा देखिल न आणणाऱ्या नवऱ्याच्या बायकोने करावे. सासूला विचारून ऑफिसातून भाजी आणणाऱ्या अन घरातले शिळे चुपचाप खाणाऱ्या सुनेने करावे. आपल्यालाही एकदाच हा जन्म मिळाला आहे, हे विसरणाऱ्या, adjustment मध्ये धन्यता मानणाऱ्या, शरीराचे न ऐकणाऱ्या ठार बहिऱ्या प्रत्येक बाईने हे व्रत करावे.

दिव्याच्या अमावस्येला सुरवात करावी. श्वास असेपर्यंत ते पाळावे. ही चाळिशीची साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण.

प्रदक्षिणा करण्यामुळे नेमका कोणता हेतू साध्य होतो ? What exactly is the purpose of circumambulation?

क्षेत्रांमध्ये असणाऱ्या देवदेवतांपैकी काही देवता दर्शन प्रधान असतात तर काही देवता प्रदक्षिणा प्रधान असतात. विशेषतः दत्तक्षेत्रांमध्ये प्रदक्षिणा घालून उपासना करण्याची प्रथा आहे. तिरुमलाई, गुरुवायुर, रामेश्वर, वाराणशी, पंढरपूर, पुरी इत्यादी क्षेत्रातील देवतांचे एकदा दर्शन झाल्यानंतर पुन्हा दर्शनाची किंवा प्रदक्षिणा घालण्याची शक्यता नसते. आशा क्षेत्रात नामसंकीर्तनाने उपासना केली जाते. देहाने कष्ट घेऊन प्रदक्षिणा करण्यामुळे देह, ईंद्रिये आणि मन यावर त्या देवतेचे सूक्ष्म परिणाम होत जातात. कारण आपले उजवे अंग देवाकडे ठेवून सतत प्रदक्षिणा करीत राहिल्यास सूक्ष्म प्रमाणात विद्युज्जनित्र प्रक्रिया सिद्ध होते. देह, बुद्धी व चित्त यामधील विकार दूर होण्यासाठी प्रदक्षिणेसारखे साधन नाही. कारण प्रदक्षिणेमुळे हात व पायांना चांगला व्यायाम घडतो. त्यामुळे देहशुध्दी होते. वाणीने जप चालू असल्यामुळे वाचाशुध्दी होते. एका ठिकाणी स्थिर बसल्यावर जेवढे विचार मनात उद्भवतात त्या मानाने प्रदक्षिणा करताना उद्बवणाऱ्या विचारांचे प्रमाण बरेच अल्प असल्यामुळे चित्तशुध्दी होत जाते. प्रदक्षिणेच्या संख्येचे ध्येय समोर असल्यामुळे बुध्दीला कंटाळा, औदासिन्य व मालिन्य येत नाही. त्यामुळे बुद्धी शुद्ध होत जाते. मनोविकृतीने पछाडलेल्या (अडाणी लोकांच्या भाषेत बाधिक झालेल्या) कित्येक व्यक्ती प्रदक्षिणेच्या माध्यमातून इष्टदेवतेची उपासना करून खडखडीत बऱ्या झालेल्या आहेत. म्हणून बहुतेक देवालयात प्रदक्षिणेसाठी मार्ग तयार केलेला असतो.

Leave a Comment