“एकादशी” हे एकच व्रत असे आहे की, जे नेहमीप्रमाणे संकल्प वगैरे करून विधीपूर्वक घेण्याची आवश्यक नसते. कारण हे व्रत जन्मतःच लागू होते. ते आमरण घडणे इष्ट आहे. ‘एकादशी व्रत’ हे इतर सर्व व्रतास पायाभूत असल्यामुळे किमान पात्रता प्राप्त करून घेण्याची इच्छा असणाऱ्यांनी एकादशी व्रत केलेच पाहिजे. एकादशी न करता इतर व्रते केल्यास ती फलित होण्यास विलंब लागतो, असे दृष्टोत्पत्तीस येते. विशेषतः सोळा सोमवार, संकष्ट चतुर्थी, प्रदोष, शिवरात्री, अष्टमी, वटसावित्री इत्यादी अनेक व्रते शीघ्रफलदायी होण्याची इच्छा असणाऱ्यांनी एकादशी व्रत अवश्य करावे. मॅट्रिक झाल्याखेरीज पुढच्या टप्प्याचे काॅलेज शिक्षण करता येत नाही. त्याप्रमाणे एकादशी न करता कुठल्याच व्रतास अधिकार प्राप्त होत नाही. एकादशीला एवढे महत्त्व प्राप्त होण्याचे कारण म्हणजे त्या तिथीला सर्व प्राणिमात्रांची गती ऊर्ध्वदिशेस विशेष प्राबल्याने असते. चंद्रावर जाणारी याने पृथ्वीवरून सोडण्याच्या तारखा पाहिल्या तर त्यातील बऱ्याच तारखा एकादशीला किंवा एकादशीच्या अलिकडे पलिकडे पडलेल्या दिसून येतात. आपल्या देहातील चैतन्यही त्या दिवशी ऊर्ध्व दिशेस अधिक वेगाने झेपावते. अशावेळी अल्पाहार केल्यास अंगी पारमार्थिक उत्क्रांती होण्याची पात्रता येऊन सत्संकल्प पूर्ण होण्यास मदत होते. एकादशीस निराहार करून फक्त पाणी व सुंठ-साखर खाल्ल्यास तो उत्तम पक्ष संभवतो. त्या दिवशी पोटातील सर्व आवयवांना उत्कृष्ट विश्रांती मिळाल्यामुळे ते अधिक कार्यक्षम होतात व मनाची शक्तीही वाढते. पण ते शक्य नसल्यास अल्प हविष्यान्न खाणे हा मध्यम पक्ष होय. तेही अशक्य झाल्यास किमान गव्हासारखे एकधान्य खाऊन एकादशी करावी. एखाद्या हट्टी व्यक्तीला वरील कोणतीच गोष्ट शक्य नाही, पण आध्यात्मिक उंची वाढविण्यासाठी व धर्मपालन करण्याची इच्छा आहे, अशाने निदान एकादशीच्या दिवशी ‘माझी एकादशी आहे, माझी एकादशी आहे’ असे म्हणत रहावे. त्या निमित्ताने आपोआपच त्याच्याकडून सामिष आहार, अभक्ष्यभक्षण बंद होऊन हळुहळू खरी ‘एकादशी’ घडण्यास मदत होईल.
एकादशी व्रताचे माहात्म्य काय ? हे व्रत कोणी करावे ?
शास्त्राने महिन्यातील दोन्हीही एकादशा कराव्यात. पण गृहस्थधर्माचे पालन करणाऱ्याने निदान शुध्द एकादशी अवश्य करावी. एकादशी व्रताची सांगता व्रतोद्यापन करून करता येते. पण व्रतोद्यापन झाल्यावरही एकादशी उपवास चालू राहणे इष्ट आहे. एकादशी व्रत करताना हविष्यान्न वा फलाहार भक्षणाबरोबरच ब्रम्हचर्यपालन, देवपूजन, हरिहरास तुलसीबिल्व अर्पण, सत्यभाषण, परनिंदात्याग, दान या गोष्टी अगदी अगत्यपणे कराव्यात. त्यामुळे एकादशी व्रताचे पुरेपुर फल मिळण्यास मदत होते. काही लोक एकादशी दिवशी विष्णुसहस्त्रनाम, शिवसहस्त्रनाम, रुद्रपठन, गीतापठन, शिवलीलावाचन या गोष्टी करतात. ही अत्यंत चांगली गोष्ट असून, त्यामुळे त्यांची आध्यात्मिक प्रगती अत्यंत वेगाने होण्यास मदत होते. एकादशीच्या आदल्या दिवशी रात्री उपवास करावा व स्त्रीस्पर्श वर्ज्य करावा. उपवास शक्य नसेल तर रात्रीच्या पहिल्या प्रहरापूर्वी अल्पाहार करावा.