विजेबाबत अनेक गैरसमज : काय आहे खरे सत्य? | Many misconceptions about electricity: What is the real truth?

विजेबाबत अनेक गैरसमज : काय आहे खरे सत्य? | Many misconceptions about electricity: What is the real truth?

ग्रामीण भागातच नव्हे तर सुशिक्षितांमध्येही विजांबाबत अनेक गैरसमज आहेत. काही गैरसमज एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अगदी सहज प्रवाहित होत राहतात. योग्य माहितीअभावी हेच गैरसमज समाजामध्ये पसरत राहतात.

ढगांची टक्कर:
‘दोन ढगांची टक्कर झाली की विजा चमकतात’ असे अनेकांनी ऐकले असेल. मात्र वैज्ञानिक सत्य काही वेगळेच आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ढगांतून जेव्हा विद्युतभार वाहून जातो तेव्हा वीज चमकते. ढगांच्या टकरीचा येथे काही एक संबंध नाही.

पायाळू माणूस:
पायाकडून जन्म झालेल्या पायाळू माणसावर वीज कोसळण्याचा धोका जास्त असतो, हा देखील एक गैरसमजच आहे. विजा पडताना त्या कमीत कमी रोधक मार्गाची निवड करतात. एखाद्या व्यक्तीने डोक्याकडून जन्म घेतला की पायाकडून, यावर व्यक्तीच्या शरीराची रोधकता अवलंबून नसते. विजांचा धोका जेवढा डोक्याकडून जन्म घेणाऱ्या व्यक्तीला आहे, तेवढाच पायाकडून जन्म घेणाऱ्यालादेखील आहे.

मानवी शरीरातून विजेचा ‘शॉक’:
वीज कोसळलेल्या व्यक्तीला स्पर्श केला तर आपल्याला शॉक बसेल’ हादेखील गैरसमज सर्वत्र रूढ आहे. परिणामी, वेळेवर प्रथमोपचार आणि कृत्रिम श्र्वासोच्छ्वास न मिळाल्याने भारतात दरवर्षी हजारो लोकांचे मृत्यू होतात. सत्य हे आहे, की मानवी शरीर वीज साठवूच शकत नाही. तसेच एका सेकंदापेक्षा कमी काळात वीज कोसळण्याची संपूर्ण क्रिया घडून मानवी शरीरातून जमिनीत निघून जाते.

विजा आणि भूमिगत जलसाठा:
‘वीज कोसळलेल्या ठिकाणी विहीर खणल्यास पाणी लागते’, अशी एक धारणा आहे. पठारी भागातील काही शेतकऱ्यांचा अनुभव ही गोष्ट सत्य असल्याचे सांगतो. मात्र डोंगरावर अनेक ठिकाणी विजा कोसळतात. तेथे खोलवर विहीर खणल्यास देखील पाणी लागत नाही असाही अनेकांचा अनुभव आहे. भूमिगत जलाचा साठा आणि तो शोधण्यासाठी विजांचा उपयोग यावर अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.

*कोरडी झाडे:
कोरड्या झाडाखाली थांबणे सुरक्षित असते’ हादेखील गैरसमज आहे. झाडे ही कमी रोधकाचा मार्ग असल्याने विजांना कोसळण्यासाठीचे सोईचे स्थान बनते. त्यामुळे कोरडे असले तरी विजादेखील कोसळताना झाडांचा आसरा घेऊ नये.

दूरच्या विजा:
‘विजा दूर कोठेतरी चमकताना दिसत असतील, तर आपण सुरक्षित आहोत’ हादेखील अजून एक गैरसमज आहे. कारण विजा पंधरा किलोमीटरपेक्षा अधिक अंतर कापून कोसळल्याची असंख्य उदाहरणे आहेत. यामुळेच विजा चमकत असताना सुरक्षिततेसाठी क्रिकेट, फुटबॉल आदी सामनेदेखील आंतरराष्ट्रीय पातळीवर ताबडतोब थांबविले जातात.

*गडगडाट नसलेल्या विजा:
‘आवाज न करणाऱ्या उन्हाळी विजा घातक नसतात’ असा गैरसमजदेखील रूढ आहे. विजांमध्ये सरासरी सुमारे २५ हजार ऍम्पिअरपासून ४० लाख ऍम्पिअरपर्यंतचा विद्युतप्रवाह (करंट) असू शकतो; त्यामुळे गडगडाटाचा आवाज आला नाही, तरी अशी कोसळणारी वीज जीवघेणी ठरू शकते हे वैज्ञानिक सत्य आहे.

जाड बूट:
‘जास्त जाडीचे बूट घातले म्हणजे वीज पडणार नाही’ हा गैरसमज आहे. विजांमध्ये एवढी ऊर्जा असते, की दगडदेखील वितळून जातात. त्यामुळे जास्त जाडीचे बूट- चप्पल सुरक्षितता देण्यास उपयोगी नसतात.

*लायटनिंग अरेस्टर आणि सुरक्षित घर:
‘लायटनिंग अरेस्टर लावणे आणि घरात थांबले, की आपण विजांपासून सुरक्षित असतो’ असा अनेकांचा गैरसमज असतो. मात्र लायटनिंग अरेस्टर योग्य प्रकारे लावलेला आहे, त्याचा सुरक्षा कोन आणि योग्य प्रकारे केलेले वेगळे अर्थिंग यावर आपली सुरक्षितता अवलंबून आहे. आपले घर पत्र्याचे असेल किंवा शेती- मळ्यात सर्वांत उंच असेल, तर ते असुरक्षितच आहे. कारण त्यावर विजा कोसळण्याची शक्यता जास्त असते.

*मोबाईलला विजांचे आकर्षण:
मोबाईल विजांना आकर्षित करतात’ हादेखील गैरसमजच आहे. विशेषत: प्रसारमाध्यमांमुळे हा गैरसमज वेगाने पसरला गेला. २००६ मध्ये मुंबई येथे समुद्नकिनारी आपल्या मित्रांचे मोबाईल सांभाळणाऱ्या एका मुलीवर वीज कोसळली. मोकळ्या जागी उभी असल्याने उंची वाढल्यामुळे वीज आकर्षणाने अशी दुर्घटना झाली. सर्वांचे मोबाईल या मुलीकडे होते, हे विजा आकर्षित होण्याचे कारण मुळीच नाही.

🔹व्यावहारीक दृष्टिकोनातून बघितले तर मोबाईलच्या सिग्नल पॉवरपेक्षा, मोबाईल टॉवरवर मोबाईलरेंजसाठी कार्यरत असलेल्या असंख्य मोबाईल ऍन्टिनांची, ‘सिग्नल पॉवर’ हजारोपट जास्त असते. अशा वेळी विजा या सेन्सर ऍन्टिनावर कोसळणे किंवा त्यांची दिशा बदलताना दिसणे तरी आवश्यक आहे; मात्र असे होत नाही. यावरूनदेखील हे सत्य सिद्ध होते की मोबाईल विजांना आकर्षित करीत नाही.

🔹सत्य :
निसर्गचक्रात भेदभाव होत नाही. आकाशातून कोसळणारा प्रचंड विद्युत प्रवाह म्हणजे वीज पडणे किंवा चमकणे होय. वीज हा निसर्गचक्राचा भाग आहे. ‘कमीत कमी रोध असेल अशा वस्तू, ठिकाण किंवा व्यक्तीवर कोसळणे’ हा भौतिकशास्त्राचा नियम पाळण्याचे काम वीज करते. जीवघेणी वीज कधी, कुठे, कशी कोणावर कोसळते हे जाणून घेणे, त्यापासून स्वसंरक्षण करणे आणि कोणावर वीज कोसळलीच, तर त्या व्यक्तीला मदत करून तिचे प्राण वाचविणे एवढेच या निसर्गचक्रात आपल्या हाती आहे.

Leave a Comment