पंढरपूर वारी | पंढरीची वारी | Pandharpur Wari
पंढरीच्या वारीची महाराष्ट्रात शेकडो वर्षांपासून असलेली परंपरा ही या भूमीची धार्मिक/ पारमार्थिक परंपरा असल्याचा आपला दृढ विश्वास आहे आणि काही लाख वारकरी शेकडो दिंड्यांच्या माध्यमातून या वारीत सहभागी होत असलेले आपण पाहतोच… तथापि निव्वळ धार्मिक आशयाच्या मर्यादित दृष्टीने या वारीकडे पाहणे बदलत्या सामाजिक संदर्भात जरा खटकते. वारीचे सर्वांगीण आकलन करून घेण्यात आपण कमी पडतोय असे वाटते!
वारीकडे अनेक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास या साध्या परंपरेत दडलेले भारतीय परंपरेतले अनेक विलोभनीय/आशयसंपन्न पैलू समोर येतात आणि आपल्याला अंतर्मुख करून एका उदात्त आकलनाच्या/ अनुभवाच्या पातळीवर घेऊन जातात…..
प्रतिवर्षी आळंदी ते पंढरपूर वारीत सहभागी झालेल्या दिंड्या आणि वारकरी यांच्याबद्दल वर्तमानपत्रांतून भरभरून केलेले लिखाण/ फोटो आपण पाहतो… त्यात एकूण वारकर्यांचा पंढरपूरमधील आकडा १२ लाखांच्याही वर असल्याचे आपण वाचतो. या १२ लाख वारकर्यांचे दोन वेळचे भोजन, नाष्टा, चहा वगैरे खर्च प्रतिदिन किमान २०० रु. गृहीत धरल्यास ही गोळाबेरीज अवघ्या १५ दिवसांत ३६० कोटी रुपयांच्या घरात जाते. त्याशिवाय या वारीच्या दरम्यान धार्मिक ग्रंथ, माळा, हार, शाली, प्रसाद, प्रवासखर्च हीसुद्धा कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते…..
प्रत्यक्ष मंदिरातील दानपेटीत भक्तांनी दिलेल्या रकमा, पंढरपूरमधील विविध मठांनाही दिल्या जाणार्या देणग्या, एस.टी. बसेसपासून हॉटेल्सपर्यंत होणारा व्यवसाय आणि या शेकडो कोटी रुपयांच्या प्रचंड उलाढालीतून सहजपणाने खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणारा रोजगार हे सारे वारीचे अर्थशास्त्रीय विश्लेषण पाहिले की, आर्य चाणक्यांनी २३०९ वर्षांपूर्वी लिहिलेले कालातीत चाणक्यसूत्र ‘धर्मस्य मूलम् अर्था:।’ आठवते आणि त्याची सर्वकालीन महतीच पटते…..
५००० वर्षांपूर्वी रणांगणावर अर्जुनाला श्रीमद्भगवतगीतेचा उपदेश करताना श्रीकृष्णाने दैवी गुण संपदेत वर्णिलेल्या ‘दानाची’ महती आजही पटते… महात्मा गांधीजींनी त्यांना समजलेली भारतीय/ हिंदू संस्कृती ज्या सात आर्य सत्यात सोप्या शब्दांत सांगितली, त्यातले एक आर्यसत्य आहे- ‘त्यागाशिवाय भक्ती निरर्थक आहे!’ केवळ उदाहरणादाखल दिलेल्या या वेगवेगळ्या काळातील भारतीय इतिहासातील ५००० वर्षांतील तीन व्यक्तींच्या विचारामधील एकाच अर्थाचे वैचारिक सूत्र आणि त्याचे आकलन नसतानाही वारीच्या निमित्ताने त्या सूत्राशी सुसंगत लक्षावधी भक्तांचे आचरण आपल्याला थक्क करून टाकते…..
कवी कुलगुरू कालिदासांच्या ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या वचनाने प्रारंभ होणार्या विख्यात काव्यात येणारे सौंदर्यपूर्ण असे प्रकृतीचे समृद्ध वर्णन करत सहभागी होणारे वारकरी याची देही याची डोळा प्रत्यक्ष अनुभवतात… सर्वत्र रसरशीत हिरवाईने नटलेली प्रकृती डोळे भरून पाहताना, आकाशातल्या कृष्णमेघांच्या संगतीने रंगणारा छाया/ प्रकाशाचा विराट स्केल साक्षीभावाने अनुभवताना हृदयात उचंबळून येणार्या अनिवार आनंदाच्या ऊर्मी, हे सारे विठुरायाच्या ओढीने येणारे लक्षावधी वारकरी ईश्वरी कृपेच्या वर्षावात/ जलधारांनी चिंब भिजताना ज्या प्रसन्न चित्ताने अनुभवतात, ते पाहणेही अत्यंत सुखदायक आहे…..
आपल्या भारतात फार प्राचीन काळापासून १२ फेब्रुवारीवर आधारलेली, गावातील लोकांना गावातच रोजगार मिळवून देणारी, गावाच्या सार्या गरजा गावातच पूर्ण होतील अशी कृषी- अर्थव्यवस्था आणि खरीखुरी आत्मनिर्भर ग्रामव्यवस्था अस्तित्वात होती… या व्यवस्थेचे खूप फायदे असले, तरी गावातील लोकांच्या जाणिवेचा विचार पंचक्रोशीपलीकडे जात नसल्याने ते बाह्य जगाबद्दल अनभिज्ञ राहण्याची शक्यताही होती. यावर मात करून आपला सारा भारत, त्यातल्या कोट्यवधी भारतीयांच्या धार्मिक पर्यटनावर आधारित एकाच सूत्राने जोडण्याची विलक्षण किमया ‘वारी’सारख्या परंपरांनी केली आहे…..
वेगवेगळ्या प्रदेशातील भक्त विठुरायाच्या ओढीने एकत्र येण्याने, त्यांच्यात होणार्या मुक्त संवादाने, त्यांच्या जातिभेदापलीकडे जाऊन वारीच्या निमित्ताने संतांच्या उपदेशाने प्रस्थापित होणारी स्वाभाविक समता आणि आत्मीयता यामुळे आपल्या संपूर्ण देशात लोकसंचाराने होणारे धार्मिक, सामाजिक अभिसरण हेच आपल्या भारताचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण बलस्थान ठरले आहे… यामुळे आपण भारतात दक्षिणेपासून उत्तरेकडे आणि पश्चिमेपासून पूर्वेकडे मुक्त संचार केलात, तर सारा भारतच एका सांस्कृतिक सूत्रात बांधलेला आपल्याला दिसतो…..
वेगवेगळ्या प्रदेशात असणार्या अनेक भाषा, जाती, वैविध्यपूर्ण आहार/ विहार पद्धती, या सार्या अनेकतेला एका सूत्रात गुंफणारी आपली सांस्कृतिक एकता केवळ धार्मिक पर्यटनामुळेच खूप मोठ्या प्रमाणात लोकांच्या येणार्या संपर्कानेच टिकून राहिलेली आहे…..
अपरिचित मुलखात/ माणसांमध्ये वावरताना अगदी स्वाभाविकपणाने येणारी मानसिक असुरक्षितता कोट्यवधी भारतीयांना धार्मिक ओढीने एकत्र येण्याने कधीही जाणवली नाही… गेल्या हजारो वर्षांतील ‘वारी’सारख्याच चारीधाम यात्रा आणि अनेक तीर्थक्षेत्रांच्या यात्रा आणि सार्या भारतीयांना अगदी समरस करून टाकतात. मागील १२०० वर्षांत परधर्मीयांनी भारतावर केलेली प्रचंड आक्रमणे, लूट, विध्वंस, धर्मांतरे हे सारे पचवूनही ही प्राचीन भारतभूमी आपल्या सार्या सांस्कृतिक गुणवैशिष्ट्यांसह टिकून राहिली, याचे एकमेव कारण आपले धार्मिक पर्यटन आहे. आपल्या इतिहासातील जे जे महापुरुष सारा भारत फिरले, त्यांना झालेले भारताचे आकलन इतके प्रभावी आहे की, त्यांचे प्रेरक विचार आजही आणि पुढे येणार्या शेकडो वर्षांत आपल्याला या देशाची एकता/ स्वातंत्र्य/ समता अबाधित ठेवण्यास पुरेसे आहेत…..
या संदर्भात आद्य शंकराचार्य, संत नामदेवराय, समर्थ रामदास, स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी या सार्यांचे विचार दर्शन आणि योगी अरविंदांनी मांडलेली विश्वमानवाची उत्तुंग संकल्पना केवळ भारतीयांनाच नव्हे तर सार्या विश्वाला मार्गदर्शक ठरेल…..
धार्मिक पर्यटनामुळे तीर्थक्षेत्रांना समाजाने अर्पण केलेली प्रचंड संपत्ती पुन्हा त्या त्या ठिकाणी समाजहितासाठी अन्नदान, ज्ञानदान, आरोग्य व्यवस्था यासारख्या अनेक रचनात्मक प्रकल्पांमधून पुन्हा याच समाजपुरुषाच्या चरणी अर्पण होते… त्यागावर आधारलेली आपली भारतीय चक्राकार अर्थव्यवस्था संपत्तीचे जास्तीत जास्त विकेंद्रीकरण करून समाज हितासाठी अगदी अपरिचित व्यक्तीलादेखील पदवंदन करून वारकरी संप्रदायात जो नमस्कार करतात, तो व्यक्तित्वात दडलेल्या ईश्वराचा आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीचा आत्मसन्मान जपण्याचा सर्वोत्तम आविष्कार आहे…..
नम्रतेने झुकण्याने मनुष्य खुजा होत नाही, उलट त्याचे अंत:करण विशाल होते… ही साक्षी कृती इतक्या स्वाभाविकपणाने आणि उत्कटतेने लक्षावधी वारकर्यांमध्ये घडते, ज्यामुळे माउलींच्याच शब्दात ‘ये हृदयीचे ते हृदयी’ प्रेमाचे थेट संक्रमण होऊन स्वत:चे वेगळे असे व्यक्तित्व न राहता वारकरी आपल्या वैश्विक जाणिवा विकसित झाल्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतात. अहंकाराचा ताठपणा मोडून जातो. प्रेत वाकू शकत नाही, जिवंत मनुष्यच वाकू शकतो. मनुष्याची शारीरिक लवचिकता मनावरच्या संस्कारानेच संभवते. जेवढ्या वेळा मेरुदंड वाकून सरळ होईल तेवढी बुद्धी/ जाणीव/ स्मृती तल्लख होईल, दृष्टी उत्तम राहील, हे सारे शरीरशास्त्राचे सिद्धांत व्याख्यान देऊन समजावून न सांगता, एका साध्या कृतीने अमलात आणता येतात. यात ‘योग: कर्मसु कौशबम!’चा अर्थबोध होतो. म्हणूनच महाभारतात व्यासमहर्षींनी पितामह भीष्मांच्या मुखातून मोक्षपर्वात ‘आचार प्रथमो धर्मा:।’ हे वचन उच्चारले….