आईचा मुलीच्या संसारात हस्तक्षेप | Mother’s intervention in daughter’s life
तिचा फोन वाजला जाग त्याला आली. Mama calling होते. त्याने वैतागून तिला हलवले. उठ तुझ्या आईचा फोन आहे, रविवारी पण सुखाने झोपू देत नाही.
तिने फोन घेतला सोनू उठली का? “अग कांद्याचं थालीपीठ करणार आहे नाश्त्याला येते का?” “अग आई अजून झोपेत आहे. त्याचा काय प्लॅन आहे माहिती नाही.”
“अग नवऱ्याला काय विचारते सोनू ? तुला आवडते म्हणून मी करते म्हणलं, सुट्टी आहे तुला आराम तेवढाच.”
सोनू विचारात पडली. कारण रात्रीच नवऱ्याने प्लांनिंग सांगितले होते. मस्त झोपुयात. उठून कांदे पोहे बनव तुझ्या हातचे. कुठे जायचे नाही. मस्त पुस्तक आणलं आहे, ते आज संपूर्ण करेन.
आता ती विचारात पडली, आईला काय सांगू? तिला राग येईल. जावे तर ह्याचा रविवार spoil होईल. अशा अनेक द्वंद्व युद्धात सापडलेल्या माझ्या सख्यांची आईच समस्या बनली. दिवसेंदिवस ही समस्या गंभीर रूप धारण करत आहे.
‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी: अशा न या सारख्या अनेक सुविचारांनी आपल्याकडे आईचे महत्व अधोरेखित केले आहे. आई खरोखरच महानच असतेच. पण मग हीच आई मग मुलाची किंवा मुलीची आई असली, तरी तिचा मुलांच्या संसारात वाढता हस्तक्षेप केंव्हाही वाईटच.
पूर्वी एक काळ असा होता की, मुलाची आई खूपच ढवळाढवळ करायची. त्यामुळे सासू बदनाम झाली. जमाना बदलला… कुटुंब अगदी मायक्रो झाली. फक्त तो आणि ती दोघेचं. अशावेळी मुलांच्या संसारात अधिक्षेप वाढला तो मुलीच्या आईचा. तिच्या वाट्याला न आलेल्या राजाराणीच्या संसाराची स्वप्न ती लेकीच्या संसारात पाहू लागली. मग प्रत्येक गोष्ट ती स्वतच्या मताप्रमाणे तिच्या संसारात करू लागली.
मुलगाही सुरुवातीला तिची जबाबदारी तिच्या आईने घेतलेली बरी ह्याच्या आईने घेतली तर उडणाऱ्या खटक्यांमध्ये त्याच सँडविच होणार… त्यापेक्षा हे बरे. तो सुरुवातीला सोयीस्कर दुर्लक्ष करतो. पाहुण्यांच्या काठीने साप मारण्याचा हा प्रकार.
मग सुरुवातीला केलेले हे दुर्लक्ष नंतर अंगाशी यायला सुरुवात होते. मग तिची आई जणू ह्यांच्या संसाराचा ताबाच घेते. मुळातच मुलगी एकुलती एक असल्याने तिने लग्नाआधी तिला काही काम लावलेलं नसते. “माझ्या मुलीला मुलासारख वाढवले” अशा थाटात सांगणाऱ्या आईला आता तिचे लग्न झाल्यावर “तिला संसाराचा गाडा हाकायला आपण समर्थ बनवलं नाही” हे जाणवते.
मग ती आई तिला सकाळी उठल्यापासून फोन करायला लागते. उठली का ? चहा झाला का ? नाश्त्याला काय केले?. इथपासून ते घरी किराणा सामान भाजी घ्यायच्या वस्तू या सगळ्यात ती सल्ले देऊ लागते. मग तिचा अधिक्षेप नको इतका वाढू लागला.
आता मात्र ही आई डोकेदुखी बनली. कोणत्याही नात्यात एका सीमारेषा पलीकडे हस्तक्षेप केला की ते नाते बिघडते. त्यातून सल्ला देणारी आई जर समतोल विचारांची नसेल, चुकीचे सल्ले देणारी असेल, तर मुलींच्या संसाराची वाट लागते.
माझ्या बघण्यात अशी अनेक उदाहरणे आहेत आईमुळे मुलींचे संसार उध्वस्त झाले आहेत. मग आईच्या माघारी या मुलींना पश्चाताप होतो पण वेळ निघून गेलेली असते.
ही आई त्या मुलीला तिच्या सासरी रममाण होऊच देत नाही. त्यांच्या चालीरिती, जेवणाच्या सवयी, सणवार, कुळधर्म कुलाचार या सगळ्या बाबतीत ती स्वतःचे चालवते. मुळात सासरच्या साऱ्या सवयी आत्मसात करायला तिला काही वेळ लागणार आहे. कुंडीतील रोपटे सतत उपटून दुसरीकडे लावले तर ते रुजत नाही. तिची आई तिला सासरी रुजूचं देत नाही. त्या मुलीला काही वेळा माघार घ्यावी लागणार आहे, कधी तिचेच चालणार आहे, कधी तिला सासू नवरा यांचे ऐकावे लागणार आहे… याची जाणीव ती आई तिला देत नाही.
ही पझेसिव्ह आई तिच्यासाठी सगळे निर्णय स्वतः घेते. मग त्याची जबाबदारी मात्र मुलीवर येते. ज्याचे परिणाम मुलीच्या कुटुंबावर होतात. ती मुलगी समर्थपणे खंबीरपणे तिच्या संसारात उभी राहू शकत नाही. एक अवस्था अशी येते की, मुलीचा घटस्फोट व्हायची पाळी येते. मग मात्र त्या मुलीला सगळ्याच पश्चाताप होतो.
आईची लुडबुड किती असावी असा प्रश्न पडतो. किंबहुना कोणत्याही नात्यात प्रत्येकाला आपल्या सीमारेषा माहिती हव्यात तरच नाती निर्व्याज निर्मळ फुलतील…..